लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनाने संपूर्ण जग हादरले आहे. यावर अद्यापही ठोस औषध सापडले नसून, जगातील शास्त्रज्ञ अहोरात्र परिश्रम घेऊन ते शोधत आहेत; परंतु यावर तात्पुरता उपाय म्हणून ज्या संशोधित लसी बाहेर आल्या आहेत. त्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने याची मोठी ओरड होत आहे.
देशात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोविशिल्ड या दोन लसी सध्या उपलब्ध असून, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ १६ जानेवारीला झाला होता. या चार महिन्यांत जवळपास दोन लाख ४ हजारजणांचे लसीकरण झाले आहे; परंतु यात आणखी अडचण म्हणजे ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांच्या दुसऱ्या डाेसची तारीख झाल्यावर आता हा डोस घेण्यासाठी लसच नसल्याचे सांगण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत. हे कमी म्हणून की काय केंद्र सरकारने एक मे पासून देशातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींना लसीकरणासाठीची घोषणा केल्याने आरोग्य विभाग मेटाकुटीला आला आहे.
एकूणच जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत दोन लाख ४ हजारजणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच अंगणवाडी ताई आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनीदेखील लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. आता जिल्ह्यात लसच उपलब्ध नसल्याने मोठी तारांबळ उडत असून, अनेकांना लसीकरण केंद्रावर जाऊन परत यावे लागत आहे. यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना रोषाला बळी पडावे लागत आहे.
-------------------------------------
६० वर्षांवरील
ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनी त्याच केंद्रावर मेसेज आलेल्या तारखेला जावे. तसेच कोविशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणती लस घेतली हाेती. त्याची कल्पना आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी.
------------------------------------------------
४५ वर्षांवरील
या वयोगटातील नागरिकांनी जर कुठलाच डोस घेतला नसेल, तर त्यांनी कोविन ॲप अथवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. जर लस उपलब्ध असेल तर आधारकार्ड सोबत ठेवून लस घ्यावी.
१८ वर्षांवरील लस घेतलेले नागरिक
--------------------
या वयोगटातील युवक-युवतींना कोविन ॲपवर नोंदणी असल्याशिवाय लस घेताच येणार नाही. त्यामुळे नोंदणीवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. सध्या हे ॲप हँग होण्याचे प्रकार घडत असल्याने सतर्क राहावे.
------------------------------------------------------
कोणाला पहिला मिळेना, तर कोणाला दुसरा!
कोविन ॲपवर २९ मे रोजी नोंदणी केली. कुठे लस घ्यावी त्या केंद्राचा पत्ताही आला. तेथे गेल्यावर दोन मे रोजी लस संपल्याचे जाहीर करण्यात आल्याने मोठा हिरमोड झाला आहे. आता पुन्हा लसीची प्रतीक्षा आहे.
----------------------------------------------------------
वसुधा जोशी, जालना
लसीचा पहिला डोस झाला आहे; परंतु आता दुसरा डोस घेण्यासाठीचे २८ दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु कोव्हॅस्किनची लसच उपलब्ध नसल्याने संभ्रम वाढला असून, रोज आरोग्य विभागकडे विचारणा करत आहोत.
---------------------------------------------------------
अतुल पांडव, जालना
लसीच्या टंचाईमुळे जालन्यातील सरकारी केंद्रावर दोन ते तीन वेळेस चकरा मारल्या आहेत; परंतु आम्ही अशिक्षित असल्याने नोंदणी मोबाईलवर केली का अशी विचारणा होते. त्यामुळे आम्ही परत येत आहोत.
सोपान गडमाले, जालना
------------------------------------------------------------------------