लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड : स्वत:च्या घरी शौचालय नसल्यामुळे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.रोहिलागड येथील ग्रामपंचायतची निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली होती. या निवडणुकीत शिल्पा राम दुधाटकर यांची सरपंच म्हणून निवड झाली होती. मात्र एक वर्षाच्या आतच शिल्पा दुधाटकर यांच्यावर अविश्वास दाखल करून अश्विनी वैद्य यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला होता. परंतु, शिल्पा दुधाटकर यांनी सरपंच अश्विनी वैद्य यांच्यासह इतर पाच सदस्यांनी शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अतिक्रमण केलेली जागा, नामनिर्देशन सादर करताना आवश्यक असलेला ग्रामसभेचा ठराव सादर न केल्याच्या विरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु, येथे न्याय न मिळाल्याने शिल्पा दुधाटकर यांनी अप्पर आयुक्तांकडे तक्रार केली होती. यावेळी अप्पर आयुक्तांनी अश्विनी वैद्य यांच्यासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.या निकालाच्या विरोधात अश्विनी वैद्यसह पाच सदस्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ७ जानेवारी रोजी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने अप्पर आयुक्तांचा निकाल कायम ठेवून सरपंच अश्विनी वैद्य यांच्यासह सदस्य नानासाहेब भाऊराव मगरे, संगीता प्रल्हाद वैद्य, सत्यशीला तुळजीराम पांढरे, कमलबाई सदाशिव काळुंके व मीराबाई कल्याण टकले यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
शौचालय नसल्यामुळे सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:11 AM