लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात खरीप पिकांची सोंगणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शिवाय मजुरांनी सुद्धा सोंगणीचे दर चक्क दुप्पट केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़भोकरदन तालुक्यात खरीप पिकांमध्ये मका, सोयाबीन, कापूस, मिरची या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. जून महिन्यापासूनच येथे समाधानकारक पाऊस झाला. यामुळे पिके सुद्धा चांगली आली आहेत. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सर्वच शेतक-यांनी पीक सोंगणी करून दिवाळीच्या सणासाठी घरात पिके आणण्यासाठी लगबग सुरू केली आहे. त्यामुळे पीक सोंगणीचे भाव वधारले आहेत. मका सोंगणीसाठी ४ हजार रूपये प्रति एकरचा भाव सुरू आहे. सोयाबीन सोंगणीसाठी ३ हजार रूपयांचे दर आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना बुलडाणा जिल्ह्यातून खरीप पिकांची सोंगणी करण्यासाठी मजूर आणावे लागत आहेत.यंदा पिके चांगली आली होती. पिकांच्या उत्पन्नातून आर्थिक प्रगती होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, आता मजुरांवरच मोठा खर्च होत आहे.