लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांनी केंद्राची पाहणी केली. यावेळी कॉपी करताना एक विद्यार्थी आढळून आला.शनिवारी ११ ते २ या वेळेत बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. केंद्रावर प्रशासनाकडून खबरदारी घेत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, मंठा गटशिक्षणाधिकारी एम. डी. राठोड हे परीक्षेपूर्वीच केंद्रावर हजर होतो. या केंद्रांवर ६ हॉलमध्ये स्वतंत्र बॅचवर १४७ विद्यार्थ्यांना तपासून परीक्षेला बसविण्यात आले. परीक्षेदरम्यान केंद्रावर केंद्र संचालक, उपसंचालक, ८ पर्यवेक्षक, बोर्डातील सहसंचालक, १ लेखनिक, २ सेवक वगळता इतरांना रोखण्यात आले होते. परीक्षेदरम्यान मुलांसह सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक आर. टी. चव्हाण यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.‘त्या’ संस्थेविरुध्द गुन्हा दाखल होणारजालना : दहावीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याप्रकरणी संस्था चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांनी दिली.गुन्हा दाखल करण्याचे पत्र बोर्ड व मंठा तालुक्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे शिक्षणाधिका-यांनी सांगितले. दरम्यान, मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये परीक्षेच्या अर्ध्या तासात मराठी विषयाची प्रश्नप्रत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात झाली होती. त्यानंतर परीक्षा केंद्रावर कॉप्या पुरविण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली होती.
एकास कॉपी करताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:49 AM