- गजानन वानखडे जालना : कोणत्याही कारखान्याला परवाना देताना त्याच्या मालकासह सर्व इत्थंभूत माहिती कृषी अधीक्षक कार्यालयात घेतली जाते. असे असताना जालन्यात उघडकीस आलेल्या बनावट सेंद्रिय खत प्रकरणात जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अद्यापही संबंधित कारखान्याच्या मालकाच्या नावाने तक्रार दिलेली नाही. त्यामुळे मालकांविषयी इतकी सहानुभूती कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दोन दिवसापासून चंदनझिरा पोलिसात फिर्याद दाखल होऊनही शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणारे महाभाग अद्यापही पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत. कृषी विभाग आणि पोलिसांच्या कलगीतुऱ्यामुळे तपासाला अद्यापही गती न मिळाल्याने सर्वसामान्यात संताप आहे.
जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टिलायझरच्या गोदामावर ४ मे रोजी कृषी विभागाने छापा मारुन तब्बल ६३ लाख रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त केला होता. या खतामध्ये लिंबोळी तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खतांच्या नमुन्याची तपासणी केली असता, ते सर्व बनावट आढळून आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी कृषी विभागाने चंदनझिरा परिसरातील औद्योगिक वसाहत परिसरात वरद फर्टिलायझर या सेंद्रीय खत तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन तब्बल ९० लाख रुपये किमतीचे साडेचारशे मेट्रिक टन बनावट सेंद्रीय खत जप्त केले. दोन्ही कारवाईत तब्बल दीड कोटींचा बोगस खताचा साठा जप्त केला. दोन्ही बनावट कारखाने कोणाचे हे कृषी विभागाला माहित असताना अद्यापही त्या मालकांविरुध्द तक्रार करण्यात आलेली नाही, हे विशेष.
मालकांच्या नावानिशी फिर्याद हवीखताच्या दोन्ही बनावट कारखान्यांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला दोन दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अद्यापही चंदनझिरा पोलिसांनी तपासाला गती दिली नाही. कृषी विभागाने मालकांच्या नावानिशी फिर्याद देणे गरजेचे होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे, पण तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा कृषी विभागाकडे पत्रव्यवहार करुन संबंधितांची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.