भोकरदन: पाच दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील बरंजळा पाटीजवळ कृषी विभागाने बोगस बियाणांचा भांडाफोड केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने कृषी विभागाच्या कारवाई बाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर याप्रकरणी मंगळवारी (दि.१३) मध्यरात्री कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक राजेश तांगडे यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भोकरदन-राजूर रोडवर बरंजळा लोखंडे फाट्याजवळ एका पत्राच्या शेडमध्ये २६५ क्विंटल वजनाचे बनावट बियाणे आढळून आले. या साठ्याची किंमत २८ लाख ३० हजार रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.
बियाणे अधिनियम 1966 चे कलम 7(a), 19(a), 21(2), बियाणे नियम 1968 चे नियम 2(g), 2(i), 13(1), 13(3), 38, बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील खंड 9, 13, 18,अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3, 7, 10, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 34, 420, 464, 467, 468 कलमांचे उल्लंघन केले म्हणून तालुका कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक राजेश तांगडे यांच्या फिर्यादीवरुन मे.लोकप्रिया सिड्स प्रा.लि. व जबाबदार व्यक्ती कालीपाका अमितकुमार शंकर (मेडचल मलकाजगीरी, तेलंगना), बायडेन ॲग्रोवेट इंडिया प्रा.लि.औरंगाबाद या कंपनीचे श्री.सुनिल भाऊसाहेब कऱ्हाळे (रा.वालसा डावरगांव ता.भोकरदन)पुर्णा केळणा शेतकरी उत्पादन कंपनीचे जबाबदार व्यक्ती श्री. विजय गंगाराम म्हस्के ( रा.बरंजळा लोखंडे ता.भोकरदन जि.जालना) यांच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी सुधाकर कराड, विभागीय तंत्र अधिकारी आशिष काळूसे, मोहीम अधिकारी निलेश भदाणे, कृषी अधिकारी आर एल तांगडे पोलिस ठाण्यात उपस्थित होते. सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश पाडळे हे पुढील तपास करीत आहेत.