मंठा ( जालना ) : जसा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन झाला, तसा एक वेळ भाजपचा ( BJP) मुक्ती संग्राम दिन करा. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार सर्वच बारा बलुतेदारांचे आरक्षण ( Reservation ) घालविण्याच्या तयारीत आहे. त्यात मराठा समाजाचे आरक्षण ( Maratha Reservation ) , ओबीसींचे राजकीय आरक्षण ( OBC Reservation ) गेले, येणाऱ्या काळात इतर सर्व आरक्षण घटणार आहे, असा इशारा राज्याचे बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी दिला. ते मंठा येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयोजित प्रचार सभेत बोलत होते. केंद्र सरकारने घटना बदलून आरक्षणाची व्याप्ती वाढवावी आणि मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला, त्यासोबतच जे आरक्षणापासून वंचित राहिले असतील, त्यांना आरक्षण द्यावे, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
आमदार राजेश राठोड यांनी प्रास्ताविक करून शहराच्या विकास आराखड्याची माहिती दिली. याचवेळी काँग्रेसच्या उमेदवारांवर काहीजण दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण ते खपवून घेणार नसल्याचेही आ. राठोड यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेश कुमार जेथलिया, पक्ष निरीक्षक रामकिसन ओझा, सरचिटणीस श्याम उमाळकर, राजेंद्र राख, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष किसनराव मोरे, अन्वर देशमुख, सत्संग मुंडे, कल्याण दळे, अनिल मुंडे, सुरेश नागरे, नितीन जेथलिया, तालुका अध्यक्ष नीळकंठ वायाळ यांच्यासह इतर नेते, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, पक्ष निरीक्षक रामकिसन ओझा, कल्याण दळे यांची समयोचित भाषणे झाली. सर्वांनी उपस्थितांना पक्षाची विचारधारा सांगितली.
मुंबई-नांदेड बुलेट ट्रेनसाठी प्रयत्नशील यावेळी बोलताना बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आपण मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबध्द असून जालना ते नांदेड आणि मुंबई प्रवासासाठी समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई - नांदेड या मार्गासाठी आपण बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच मंठा शहराच्या विकासासाठी आमदार राजेश राठोड यांनी मांडलेला विकास आराखडा एकदम स्तुत्य असून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करायला मी तयार आहे.