जालना : जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे काही नगरसेवकांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांना काळे फासण्याच्या कारणावरून मोठा वाद उफाळला आहे. हा वाद म्हणजे वैय्यक्तिक पातळीवरील झाला नसून, तो प्रशासकीय कामांच्या मुद्यावरून झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच गेल्या दोन वर्षात शहरातील विविध वॉर्डात जी कामे करण्यात आली, ती करताना समन्यायी धोरण न राबवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या चार दिवसांपासून जालना पालिकेतील कामकाज या ना त्या कारणाने ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे लांबणीवर पडत असल्याच्या तक्रारी आहेत.
कुठल्याही चौकशीला तयार
या तक्रारी संदर्भात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, माझ्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार केल्याचे अद्याप माझ्यापर्यंत आलेले नाही, अथवा त्या तक्रारीची प्रतही मला मिळालेली नाही, मी मसध्या मुंबईला असून, कुठल्याही चौकशीला आपण सामारे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काम मंजूर करतांना तसेच त्या कामांचे थर्डपार्टी आॅडिटही झाले असल्याने आपल्याला कुठलीच भीती नसल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले.