लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेच्या वेगवेगळ््या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी गुरुवारी टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सात समित्यांच्या सभापतीपदींची बिनविरोध निवड झाली. सहा महिलांच्या हाती सभापतीपदाची धुरा देण्यात आली आहे.टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत वेळ दिला होता. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक- एक अर्ज दाखल झाले. सर्व अर्ज वैध ठरवून अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. परंतु, कोणीही अर्ज मागे न घेतल्याने व प्रत्येकी एक - एक अर्ज आल्याने उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी सभापतींची नावे जाहीर केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापती म्हणून छाया राजेंद्र वाघमारे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पूनम राजेश स्वामी, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती सोनाली रूपकुमार चौधरी, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती मनीषा कांबळे तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वैशाली संतोष जांगडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी मालन दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची पदसिध्द स्थायी समितीच्या सभापतीपदी तर उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांची नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी संगीता पाजगे, भास्कर दानवे, संदीप नाईकवाडे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपविभागीय अधिकारी नेटके, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.समिती : नगरपालिका विरोधकांविनाच..?जालना नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची गुरूवारी विशेष सभेद्वारे निवड करण्यात आली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सर्व पक्षांना सभापतीपद देण्यात आले. त्यामुळे जालना नगरपालिका विरोधी पक्षा विना आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सहा महिलांच्या हाती सभापतीपदाची धुरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:24 AM