फोटो
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर पोलीस चौकीची दुरवस्था झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी लोकसहभागातून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणीनिमित्त येथील पोलीस चौकीच्या रंगरंगोटीसह सजावटीचे काम हाती घेतले आहे.
राजूर पोलीस चौकीची अनेक दिवसांपासून दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे इमारत परिसराची दुरवस्था झाली होती. जिल्ह्यातील ठाण्यांची वार्षिक तपासणी होणार असून, यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सपोनि. संतोष घोडके यांनी लोकसहभागातून राजूर पोलीस चौकीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव व्यापारी, ग्रामस्थांसमोर मांडला होता. व्यापारी, ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने सध्या इमारतीच्या रंगरंगोटीसह प्रांगणात वृक्षारोपण, गट्टू बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच चौकीच्या आवारात तार कम्पाऊंड करण्यात येत असून, नव्याने गेट बसवण्यात आले आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये सिमेंटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस चौकीच्या इमारतीसह परिसराला नवा लूक मिळाल्याचे दिसून येत आहे. या कामासाठी सपोनि. संतोष घोडके यांच्यासह शिवाजी देशमुख, संतोष वाढेकर, गणेश मान्टे, राजू वाघमारे, सिद्धांर्थ साबळे आदी परिश्रम घेत आहेत.
कोट
लोकसहभागातून पोलीस चौकीच्या इमारत व परिसराचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी भरीव मदत केल्यामुळे हे शक्य झाले. यानंतर पोलीस चौकीच्या आवारात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून अभ्यासिका सुरू करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे.
-संतोष घोडके, सपोनि.,
हसनाबाद पोलीस ठाणे
राजूर हे राज्यमहामार्गावर गाव आहे. तसेच राजुरेश्वरामुळे कायम भाविकांची गर्दी राहते. येथे कायम अपघाताच्या घटना घडतात. तसेच पोलिसांना महत्त्वाच्या व्यक्ती आल्यानंतर बंदोबस्त द्यावा लागतो. चौकी असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडते. राजूर पोलीस चौकीला अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ठाण्याचा दर्जा देण्यात यावा.
-कैलास पुंगळे,
माजी सरपंच, राजूर