लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिव-दमण मधून स्वस्तात विदेशी दारू ट्रकच्या माध्यमातून येथे आणून त्यावरील नॉट फॉर सेल इन महाराष्ट्राचे लेबल बदलून त्याची सर्रासपणे विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी शनिवारी दिली.यावेळी पत्रकारांशी बोलताना गौर म्हणाले की, जालना येथील एका हॉटेलवर छापा टाकून बनावट दारूचे बॉक्स आणि भिंगरी कंपनीची दारू आणून ती विदेशी मद्यात मिसळून ती विक्री करण्याचे रॅकेट जालन्यात होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून या प्रकरणी मुकेश रावसाहेब राऊत, जुगल मदनलाल लोहीया आणि अन्य एकाला अटक केली होती. त्यांच्याकडून प्रारंंभी सहा दारूचे बॉक्स जप्त केले होते. त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता अनेक धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. त्यात प्रथम भिंगरी कंपनीची दारू ही ज्या कारखान्यातून उत्पादित होते तेथून ती कमी किंमतीत खरेदी करून तिचा वापर विदेशी मद्याच्या बाटलीत मिसळण्यासाठी केला जात होता.या प्रकरणी विशेष पथकाने बीड येथे जाऊन भिंगरी दारूचा पुरवठा करणाºया विजय शंकर इ इंगळेला ताब्यात घेतले. त्याने ही दारू आपल्याला अरूण येऊबा श्रीसुंदरकडून मिळत असल्याचे सांगितले.या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता गौर यांनी व्यक्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, सॅम्यूअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलेंग्रे, रंजित वैराळ, सचिन चौधरी, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, विकास चेके यांच्या पथकाने यशस्वी केली.या प्रकरणात रवि रंगनाथ मोरे यांचाही सहभाग असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. गोवा आणि दिव-दमण या राज्यात स्वस्त मिळणारी विदेशी दारू हा ट्रक चालक नाथा काकडे हा घेऊन येत असत. त्याच्याकडून हे विदेशी दारूचे बॉक्स घेऊन त्यात भिंगरी दारू मिसळून त्याची सर्रास विक्रीसाठी एक पिकअप रिक्षा वापरली जात होती. ही रिक्षा आणि त्यातील १० बॉक्स गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष जप्त केले. या बनावट दारू विक्री प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींचा सहभाग निषन्न झाला असून, त्यांच्याकडून सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सस्ते का माल महेंगे मे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:28 AM