अंबड : तालुक्यातील रमाई आवास योजनेच्या घरकुलासाठी लाभार्थींना अंबड तालुक्यातील गावच्या वाळू घाटातून अल्पदरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिल्या.
अंबड शहरामध्ये सध्या रमाई घरकुलचे एकूण १७ घरे मंजूर असून, त्यापैकी ५ घरकुल पूर्ण झाले आहेत, तर उर्वरित १२ कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेचे एकूण ६५६ घरे मंजूर आहेत. त्यापैकी १३ पूर्ण झाले असून, ६७ प्रगतिपथावर आहेत, तर १८० लाभार्थ्यांना नव्याने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शहरासह तालुक्यामधील अनेक गावात घरकुल योजनेची कामे वाळूअभावी रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्री राजेश टोपे यांनी तालुक्यातील गोदावरी नदीच्या आपेगाव येथील वाळू घाटातून घरकुलासाठी अल्पदरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.