लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे थकीत बिल देण्यावरुन जालना व अंबड नगरपालिकेत सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जालना नगरपालिकेच्या वतीने माजी आ. कैलास गोरंट्याल व अंबड नगरपालिकेच्या वतीने देविदास कुचे यांनी सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला.यावेळी अंबड नगरपालिकेने जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून घेत असलेल्या पाणी बिलापोटी पंधरा लाख रुपयांचा धनादेश माजी आ गोरंटयाल यांच्याकडे सुपूर्द केला.जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जालन्याचे तत्कालिन आ कैलास गोरंटयाल यांनी सरकारच्या विरोधात जात आंदोलनाचे हत्यार उपसले होते, त्यांच्या प्रयत्नानेच जालना शहरासाठी ही योजना कार्यान्वित झाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र अंबड शहरात मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे. जायकवाडी-जालना ही ६५ एमएलडी क्षमतेची योजना अंबड शहरातून जात असताना शहराची तहान भागवण्यासाठी या योजनेतून अंबड शहरास ४ एमएलडी पाणी देण्यात यावे अशी मागणी अंबड नगरपालिकेने केली होती. मात्र, जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना निर्माण होत असताना त्यात कोठेही अंबड तसेच इतर कोणत्याही शहराचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या योजनेतुन कोणत्याही शहराला पाणी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी भूमिका त्यावेळचे जालन्याचे आ. गोरंट्याल यांनी घेतली होती. अंबड शहराला या योजनेतून पाणी मिळावे यासाठी विविध आंदोलने करण्यात आली.
पाणीबिलापोटी १५ लाखांचा धनादेश सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:23 AM