छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले
By विजय मुंडे | Published: October 14, 2023 01:07 PM2023-10-14T13:07:39+5:302023-10-14T13:09:31+5:30
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता.
- विजय मुंडे/पवन पवार
अंतरवाली सराटी: अंतरवाली सराटीतील सभेसाठी सात कोटी रूपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. शिवाय सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. या वक्तव्यांचा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सहकार्यांना समज द्यावी, असेही जरांगे म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे शनिवारी दुपारी आयोजित सभेत जरांगे बोलत होते. आजच्या जनसागराने मराठ्यांची ताकद शासनाला दाखवून दिली आहे. आपल्या मुलांचे भविष्य सुखाचे घडवायचे असेल तर आज आपल्या संघर्ष करावा लागणार आहे. आता मागे हटायचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाने मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा.मराठा समाजाने पुढील दहा दिवस गाफिल राहू नये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. उचकू नका उद्रेक व जाळपोळ करून नका. शांततेत आंदोलन करा. आरक्षण मिळाल्याशिवाय मी माझ्या घरचा उंबरा शिवणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असा पुर्नरूच्चारही जरांगे यांनी केला.
२२ ऑक्टोबरनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त समितीला पाच हजारावर कागदपत्रांचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता समितीचे काम बंद करून तात्काळ मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करीत आरक्षण द्यावे. आता आमची वाट पाहण्याची क्षमता नाही. पुढील दहा दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
सभास्थळापासून १० किमी अंतरावर वाहने
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. सभास्थळावरून दहा किलोमीटर अंतरावर वाहने लावून लाखो समाज बांधव सभास्थळी दाखल झाले होते. छत्रपतीसंभाजीनगर, जालना, बीडसह इतर मार्गावर, शेतशिवारात वाहनांच्या रांगाच रांगा होत्या.