अंबड : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी अंबड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर नारळ फोडून आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना देण्यात आले.
गत महिन्यात झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच जिल्ह्यात परतीच्या पावसानेही हजेरी लावल्याने उरलेली पिकेही हाताची जात आहे. अशा परिस्थितीत शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शिवनाथ काळवणे, तालुकाध्यक्ष राधेश्याम पवळ, पांडुरंग गटकळ, युवक तालुकाध्यक्ष उमेश गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रमोद मंगदारे, कैलास पाटील, तुळशीराम टाकसाळ, धीरज जिगे, सोपान उडदंगे, अनिल सावंत, बळीराम सपकाळ, योगेश जाधव, कृष्णा आरसूळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.