घनसावंगी : कोरोनाबाधितांची संख्या घटलेली असताना बदलत्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत चिकुनगुनियासदृश आजाराने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप या कोरोनाच्या लक्षणे असलेल्या आजारासह हात-पायाच्या सांधेदुखीच्या वेदनांनी रुग्ण त्रस्त असून, खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.
घनसावंगी शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्यात आली आहे. कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायती, नगरपंचायत, महसूल, शिक्षण विभागासह विविध प्रशासकीय विभागांनी प्रयत्न केले आहेत. नागरिकांनीही सूचनांचे पालन करून लसीकरणाकडे कल दिला आहे; परंतु मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, हात-पायाच्या सांधेदुखीचा त्रास होत आहे. बहुतांश लक्षणे कोरोनासह चिकनगुनियासदृश आजाराची आहेत. या आजारामुळे ग्रस्त झालेले रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेषत: अधिक तीव्र आजार असलेल्या संशयितांची आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीही केली जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयातील विविध चाचण्यांवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
कोट
बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. काहींची चाचणी केली असता कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, चिकुनगुनियासदृश रुग्ण आढळले आहेत. त्यादृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.
-डॉ. नागेश सावरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी
चौकट
स्वच्छता महत्त्वाची
बदलते वतावरण आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह परिसरात स्वच्छता ठेवावी. पिण्याचे पाणी उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण करून प्यावे. कोणताही आजार असेल तर घरगुती औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.