मंठा : तालुक्यातील खोराडसावंगी येथील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी तळ्यात पडलेल्या एका १५ वर्षीय मुलाचे प्राण वाचविले आहे. ही घटना सोमवारी खोराडसावंगी येथे घडली.
मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नापोकॉ सुभाष राठोड व होमगार्ड जोशी हे खोराडसावंगी येथे सोमवारी निवडणूक कर्तव्यावर होते. शिवारातील एका तळ्यात वेदांत देवीदास राठोड (वय १५) हा पाण्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुभाष राठोड आणि होमगार्ड जोशी या दोघांनीही तळ्याकडे धाव घेतली. तळ्यात उड्या मारून त्या मुलाला तळ्याबाहेर काढले. पोलिसांनी वेदांतला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. आई-वडिलांनी पोलीस कर्मचा-यांचे आभार मानले. दरम्यान, वेदांत हा सोमवारी साडेबारा वाजता मित्रांबरोबर फिरायला गेला होता. या कामगिरीबद्दल खोराड सावंगी येथील ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले. याबद्दल पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, पोलीस निरीक्षक विलास निकम, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, ए.जे. शिंदे आदींनी कौतुक केले.
फोटो
वेदांत राठोडला आई-वडिलांच्या स्वाधीन करताना पोलीस सुभाष राठोड आणि होमगार्ड जोशी आदी.