- विजय मुंडे
जालना : जो तो येतो आणि दवाखान्याचे कारण पुढे करतो.. काही जण डबल शिट तर काही महाभाग ट्रिपलशिट फिरतायत...अनेकांना मास्कची अॅलर्जी दिसतेय.. अहो, आम्ही वर्गात सांगितलं तर मुलांना लगेच समजते.. पण आज भर रस्त्यावर उभारल्यावर सुशिक्षितांमधील आडाण्यांचे दर्शन होतेय... दंडाची पावती फाडताना आम्ही नागरिकांना नियमांची आठवण करून देतोय, अशा अनेक प्रतिक्रिया रस्त्यावर उभा राहून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत काम करणाऱ्या शिक्षकांनी दिल्या.
एरवी वर्गात बसून मुलांना ज्ञानदान करणारे शिक्षक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसोबत रस्त्यावर उभे राहिले आहेत. शिक्षकांच्या हातात छडी ऐवजी काठीसह शिट्टी आणि दंडाचे पावती पुस्तक आहे. शिक्षकांच्या या नव्या कामाचा शनिवारी दुपारी आढावा घेतला. शहरातील मामा चौकात शनिवारी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले हे शिक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत बंदोबस्ताचे काम पाहत होते. त्यावेळी एम.एस. जैन शाळेतील शिक्षक गजानन पत्ते, प्रकाश खाबीया, संदीप चव्हाण, रवि कोंका हे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहन चालकांची चौकशी करीत होते. बहुतांश नागरिकांचे बाहेर फिरण्याचे कारण दवाखाना, औषध खरेदी.. पोलीस घसा कोरडा पडेपर्यंत समजावून सांगत आहेत. प्रसंगी दंड करीत आहेत. विविध प्रशासकीय विभागाकडून जनजागृती सुरू आहे. मात्र, सूचनांचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक सुशिक्षितांमध्ये आडाण्यांचे दर्शन होतेय, अशा अनेक प्रतिक्रिया या शिक्षकांनी व्यक्त केल्या.
शहरातील शिवाजी चौकात ११.४० वाजण्याच्या सुमारास पोउपनि योगेश चव्हाण हे पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत बंदोबस्ताचे काम पाहत होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील शिक्षक हरी शिरसाट व शिवाजी हायस्कूलमधील प्रमोद वैराळ, विष्णू खरात, बालाजी काटे हे कर्तव्यावर होते. शहरातील नागरिकांचा संचारबंदीला प्रतिसाद आहे. मात्र मोजक्या लोकांमुळे प्रशासनावर अधिकचा ताण येत आहे. काही युवक विनाकारण फिरताना दिसून येत आहे. रस्त्यावर उभा राहून बंदोबस्ताचे काम करणे कसे असते याची चांगलीच प्रचिती मागील काही दिवसांपासून येत असल्याचे या शिक्षकांनी सांगितले.
रस्ता बंद तरीही वर्दळअंबड चौफुलीजवळील महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र, शनिवारी दुपारी १२.३० वाजता अनेक वाहन चालक येथे येताना दिसले. पोलिसांनी येणाऱ्यांकडे चौकशी केली तर अनेकांचे उत्तर दवाखाना हेच होते. जनजागृतीमुळे नागरिक मास्कचा वापर करीत असल्याचे जेईएस कॉलेजमधील विजय शिंदे, स्वप्नील सारडा या प्राध्यापकांनी सांगितले.
पोलिसांचा निवडणुकीत संपर्कपोलीस आणि शिक्षक यांचा निवडणुकीच्या काळात संपर्क येतो. तेथेही आम्ही मतदान केंद्रामध्ये असतो. शिक्षक बंदोबस्तावर असतात. मात्र, कोरोनामुळे लागलेल्या बंदोबस्तात पोलिसांचे काम किती रिस्की आहे ? याची चांगलीच प्रचिती आल्याचे राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील पीय.यू. जेथलिया, जी.ए. उपाध्याय, व्ही.डी. शिंदे, जी.एन. डोंगरे यांनी सांगितले.
ऑफ द् रेकॉर्डबंदोबस्ताचे काम दिल्याने मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे दिवसरात्र जनजागृती करूनही अनेकांना कोरोनाचे गांभीर्य अजूनही समजत नाही. सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत आम्हाला रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. आमचे काम वेगळे असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम खूपच ‘रिस्की’ असल्याची जाणीव आज रस्त्यावर उभारल्यानंतर होत असल्याच्या प्रतिक्रिया काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्या.