विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत अनेक विद्यार्थी कान-नाक- घशाच्या आजारांनी त्रस्त झाल्याचे समोर आले आहे. या आजाराने ग्रासलेल्या ११२ बालकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर दंतविकाराच्या १७३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आरोग्याची दक्षता घ्यायची सवय लागणे, त्यांच्यातील आजाराची वेळेवर माहिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम उपयोगी पडत आहे. जिल्हा रूग्णालयामार्फत चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. बालके, विद्यार्थ्यांच्या तपासणीत ह्दयविकार, कान-नाक-घशाचे आजार, दंतविकार, हाडांच्या आजाराची विद्यार्थ्यांना अधिक लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रथमोपचारानंतरही ज्या बालकांचे, विद्यार्थ्यांचे आजार कमी होत नाही, अशांवर गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात कान-नाक- घशाचे आजार असलेल्या ११२ जणांवर गत दीड वर्षात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षभरात ८६ जणांवर तर चालू वर्षात २६ जणांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दंतविकारही अनेक बालकांना आढळून आले आहेत. गत वर्षभरात १३० जणांच्या तर चालू वर्षात १२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हाडांचे विविध गंभीर आजार असलेल्या २४ जणांवरही जिल्हा रूग्णालयामार्फत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ह्रदयाचा आजार असलेले तब्बल ३५९ विद्यार्थी आढळून आले होते. यातील १४० जणांची इको टुडी तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर आजार असलेल्या ६२ जणांवर मुंबई, औरंगाबाद येथील रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासकीय खर्चातून झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पालकांनाही मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय अपेंडिक्स, किडनी व इतर आजारांनी ग्रासलेल्या मुलांवरही राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.दुभंगलेल्या ओठ, टाळूवर शस्त्रक्रियाअनेक बालकांचे जन्मत:च ओठ, टाळू दुभंगलेले असतात. त्यामुळे या बालकांना शारीरिक विकलांगपणा येतो.ओठ, टाळू दुभंगलेल्या ९५ बालकांवर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात ३२ पथकेराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तब्बल ३२ पथके कार्यरत आहेत. यात महिला, पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक परिचारिकेचा समावेश आहे. कार्यक्रम पर्यवेक्षक विद्या म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या नियोजनानुसार दररोज ही पथके विद्यार्थ्यांची तपासणी करीत आहेत.
कान- नाक-घशाच्या आजारांनी बालके झाली त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:16 AM