पिंपळगाव रेणुकाई : जे मुलं आई-वडिलांची सेवा करतात, त्यांना कुठल्याच देवाची गरज पडत नाही. कारण आई-वडील हे देवाचीच रूपे आहेत. त्यामुळे काशी- मथुरा- चारधाम तुम्हाला करण्याची गरज नाही. जिवंतपणीच आई-वडिलांची सेवा करण्याचा मौलिक सल्ला गोरक्षनाथ महाराज सोनवणे यांनी आपल्या कीर्तनातून दिला.
भोकरदन तालुक्यातील देहेड येथे फिरती चतुर्थी कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने ते बोलत होते. मनुष्य जन्माला आल्यावर सोबत काहीही घेऊन येत नाही आणि जातानासुद्धा काहीही घेऊन जात नाही. आज समाजात प्रत्येकाला संपत्तीचा, ताकदीचा गर्व होत चालला आहे. ज्यांच्याकडे सोन्याची लंका होती त्या रावणाचा देखील शेवटी गर्व हरण झाला. आपण तर त्यांच्या तुलनेत खूप नगण्य आहोत. यासाठी प्रत्येकाने जीवन जगत असताना नीतिमत्ता साफ ठेवून दुसऱ्याचे चांगले होण्याची भावना मनात रुजविणे गरजेचे आहे. शिवाय आज प्रयत्न न करता प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे; परंतु घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही.
व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे सुखी-संसार देशोधडीला लागले आहेत. व्यसनाने माणसाचे जीवन खराब होत असून, घरातील वातावरण देखील खराब होत आहे. घरात सुख व समृद्धी नांदण्यासाठी व्यसनमुक्त जीवन जगणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर, हभप विष्णू महाराज सास्ते, सुदाम महाराज निर्मळ, अंबादास महाराज लोंखडे, परमेश्वर महाराज, विठ्ठल महाराज, गोपाल महाराज, रवी महाराज, समाधान महाराज, हरिभाऊ महाराज, भागवत महाराज, शिवाजी महाराज, प्रभू महाराज, अशोक महाराज यांच्यासह भाविक उपस्थित होते.
कॅप्शन : देहेड येथील फिरती चतुर्थी कार्यक्रमात कीर्तन करताना गोरक्ष महाराज सोनवणे. यावेळी उपस्थित भाविक.