फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. मात्र मिरची उत्पादक शेतक-यांना गेल्यावर्षीचा खरीप हंगाम चांगला राहिला असल्यामुळे यावर्षी तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली. त्यामध्ये ईगल, तेजा-४ या जातीच्या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीची लागवड दुप्पट झाली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी जवळपास २ हजार ५०० हेक्टरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली.त्यामध्ये सुध्दा ज्या शेतक-यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरचीची लागवड केली. अशा शेतक-यांच्या मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले असून, सध्या या मिरचीला ४ हजार प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे तर सुरुवातीलच मिरचीला ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन, पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, आन्वा, वालसावंगी, सिपोरा बजार येथील व्यापारीही मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी करीत आहे. भोकरदन शहरात सोमवारपासून मिरची खरेदीला सुरूवात झाली. येथील बाजार पेठेमध्ये ३ हजार ५०० ते ४ हजार रूपयांपर्यंत मिरचीला भाव मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आनंदात दिसत आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त होती. शिवाय मल्चिंग पेपरच्या तापमानामुळे बहुतांश शेतक-यांचे मिरचीचे पीक खराब झाले. तर काही ठिकाणी चुरडा - मुरडा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी कठोराबाजार येथील शेतक-यांनी मिरची उपटून टाकली. मात्र ज्या शेतक-यांनी मिरचीच्या पीकांची काळजी घेऊन मिरचीचे पीक जोपासले, अशा शेतक-यांना तिखट मिरचीपासून सुध्दा चांगला गोडवा मिळण्यास सुरूवात झाली आहे.भोकरदन तालुक्यातील शेषराव सपकाळ, महादू तळेकर, कैलास सुसर या शेतक-यांच्या शेतातील मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तसेच भोकरदन ते पेरजापूर रोडवरील कैलास सुसर यांनी १४ एप्रिल रोजी दीड एकर क्षेत्रामध्ये ठिंबक सिंचन व मल्चिंग पेपरवर मिरचीची लागवड केली होती. सध्या मिरचीच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांच्या मिरचीला ४ हजार रुपये प्रतिक्टिंलच्या भावाची मागणी व्यापारी करीत आहे. त्यामुळे बोंडअळीने हैराण झालेल्या शेतक-यांना मिरचीने चांगला आधार दिला आहे. यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
भोकरदनमध्ये तिखट मिरची शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:55 AM