लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी पैठण येथून जालन्याकडे येणारी जलवाहिनी निखळल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. निखळलेला पाईप पूर्ववत बसविण्यासाठी मंगळवारपासून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.पैठण ते पाचोड मार्गाचे रूंदीकरण सुरू असताना बारा दिवसांपूर्वी पोकलेनचा धक्का लागून जालना शहराला पाणीपुरवठा करणारा पाईप निखळला. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. या घटनेची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा ही पाईपलाईन पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त दाब आल्याने सोमवारी मध्यरात्री फुटली. ही पाईपलाईन फुटल्याने पैठण धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला होता.सोमवारी मध्यरात्री पाईप निखळल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ही माहिती सकाळी कळाल्यानंतर मुख्याधिकारी नितीन नार्वेकर तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे, सभापती स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. परंतु, हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याने त्यासाठी दोन क्रेन मागवून ही जलवाहिनी एकमेकांमध्ये गुंतविण्याचे काम करण्यात आले. यावर आता सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. बुधवारी देखील यासंबंधीची देखभाल, दुरुस्ती युध्दपातळीवर सुरू असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.नगरसेवकांनीच गरजेनुसार पुरवावेत टँकरजुना जालना भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पालिकेने त्या- त्या भागातील नगरसेवकांनी आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. याचे सर्व देयके पालिकेकडून देण्यात येणार आहेत.नागरिकांना पाणी देणे हा आमचा उद्देश असून, हे पाणी जेईएस महाविद्यालयाजवळील जलशुध्दीकरण केंद्रातून पुरविले जाणार आहे. हा निर्णय झाला असला तरी बुधवारी अद्यापही कुठल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला, याच तपशील पालिकेकडून कळू शकला नाही.
जुना जालन्यातील निर्जळीने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:10 AM