नागरिक, पोलिसांचे विघ्न दूर होवो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:49 AM2018-09-16T00:49:40+5:302018-09-16T00:49:58+5:30
दोन महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिसांवर चोरी, दरोडे, लुटमार यामुळे एकामागून एक विघ्न कोसळत आहेत.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या दोन महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिसांवर चोरी, दरोडे, लुटमार यामुळे एकामागून एक विघ्न कोसळत आहेत. सध्या विघ्नहर्त्या गणेशाची धूमधडाक्यात स्थापना झाली आहे. त्यामुळे हा संकटांचा सिलसिला दूर होऊन पुन्हा सुख, समृद्धी आणि शांततेने जीवन जगण्याची कृपा गणेशरूपी विघ्नहर्त्याने केल्यासच या गणेश उत्सवाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
चोºया, दरोड्यांच्या घटनांमुळे ज्या प्रमाणे सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे, त्याच प्रमाणे पोलीसांचीही झोप उडाली आहे. तरूण तेज तर्रार पोलीस अधीक्षक चैतन्य एस. रूजू झाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने वाळू माफियांच्या बालेकिल्ल्यात जाऊन कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर त्यांची सर्वत्र वाहवा झाली. मात्र, नंतर आता ही वाळू माफियांवरील कारवाई देखील सध्या थंड बस्त्यात पडली आहे. याची अनेक राजकीय कारणे असल्याचे स्पष्टपणे बोलले जात असून, बड्या नेत्यांनी वाळू माफियांवरील कारवाईला लगाम घातल्याची जोरदार चर्चा सध्या गोदावरी पट्टयात सुरू आहे. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. वाळू माफियांचा उच्छाद संपविण्यासाठी सिंघम स्टाईलनेच पोलीसांना काम करावे लागणार आहे. वाळू माफियांचा हैदोस कायम असतानाच चोरट्यांनी त्यांचा मोर्चा आता गाव आणि शहरात वळविला आहे. वडीगोद्री, आष्टी, कुरण तसेच भोकरदन, जालना शहरात दोन महिन्यांमध्ये चोºया, दरोड्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. जालना शहरातील सोनल नगरमध्ये भरदिवसा घरफोडी करून रिव्हॉल्वर लांबविले जाते. तसेच रोख रक्कम आणि दागिन्यांवर हात साफ केला जात आहे. ही चोरी समजू शकतो. मात्र ग्रमीण भागात चोरट्यांकडून थेट महिला, मुले आणि माणसांवर शस्त्राने हल्ला करून चोरी करण्याच्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांच्या या घुसखोरीला पोलीसांकडून तेवढेच जबर उत्तर देण्यासाठी आता पोलीसांनी थेट शहागड, वडीगोद्री तसेच अन्य ग्रामीण भागात मुक्काम वाढवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप पाहिजे त्या प्रमाणात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले नाही. सध्या गौरी-गणपतीचे आगमन झाले असून, अनेकजण आपल्या महालक्ष्मीला दागिन्यांचा साज चढवून पूजा करतात. या संधीचाही चोरटे लाभ उचलू शकतात ही माहिती लक्षात घेता, पोलीसांनी गस्त वाढविली असल्याचे सांगण्यात आले. चोरी आणि दरोडे वाढण्यामागे पावसाने दिलेली हुलकावणी हे देखील एक महत्वाचे असल्याचे बोलले जाते. दुष्काळामुळे काही काम-धंदा नसल्याने देखील चोºया, दरोड्याचे प्रमाण वाढत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. या निसर्गाच्या लहरीपणासह, नागरिकही स्वत:च्या मालमत्तेची पाहिजे तेवढी काळजी घेतना दिसत नाही. गावाला जायचे झाल्यास आता तर शेजा-यालाही सांगणे म्हणजे स्वाभिमान दुखावण्यासारखे मानले जाते. पूर्वी एखादे कुंटुंब गावाला जात असेल तर त्याची पूर्व कल्पनाही शेजाºयांना असायची. आमच्या घरावर लक्ष राहू द्या, असे सांगूनच गावाला जाण्याची प्रथा होती ती आता बंदच झाली आहे. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये एखाद्या घराचा पत्ता जाणून घ्यायचा झाल्यास आसपास कोणीच नसते. हे जरी सगळे खरे असले तरी, सर्व नशीबावर सोडून चालणार नाही. त्यासाठी पोलीसांना त्यांचा जरब दाखवून त्यांच्यासह नागरिकांवरील चोºयांचे विघ्न कमी करण्याची सुबूध्दी विघ्नहर्त्याने द्यावी हीच अपेक्षा!