नुकसानीचे सरसकट पंचनामे करा
आष्टी : परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामे न करता केवळ नदी-नाले, ओढे, पाझर तलाव आदींलगत असलेल्या पिकांचे पंचनामे होत आहेत. शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
अंबड येथे भरला भाजीपाल्याचा बाजार
अंबड : शहरात गुरुवारी अनेक दिवसांनंतर आठवडी भाजीपाल्याचा बाजार भरल्याने शेतकरी, भाजीपाला व इतर विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर बाजार भरल्याने उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना दिलासा मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू झाल्यानंतर आठवडी भाजीपाला बाजारावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, गुरुवारी पहिल्यांदाच गत अनेक दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अंबडला भाजीपाल्याचा बाजार भरल्याने शेतकरी, भाजीपाला व इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती.
ऐन सण-उत्सवात विजेचा लपंडाव
जालना : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आता सण-उत्सवाचे दिवस सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. थकबाकीच्या नावाखाली एकीकडे वीजपुरवठा खंडित केला जात असताना प्रामाणिकपणे वीजबिल अदा करणाऱ्या ग्राहकांना वीजपुरवठाही सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दहिपुरी येथे सहाव्यांदा लसीकरण
अंबड : अंबड तालुक्यातील दहिपुरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी सहाव्यांदा लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्यने सहभागी होत कोविड लस टोचून घेतली. शिबिरासाठी गावचे सरपंच साहेबराव मोरे, उपसरपंच कैलास गायके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सपकाळ, आबा टापरे, जगन जाधव, लक्ष्मण साळवे, ऐ. जे. लाखे, सविता लिहिणार, रामेश्वर ताकट, विष्णू नरवडे, शाम सावंत, पांडुरंग चांदगुडे आदींची उपस्थिती होती.