राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. यामुळे शहर सुशोभित व हिरवेगार होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत पालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, याच्या अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरी भागांतील पर्यावरण पूरक बाबी करण्यासह हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वनीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होतेय की नाही, याची तपासणीही केंद्राचे पथक करणार आहे. शहरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच वनीकरण नसल्यातच जमा आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढते धूलिकण आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी अटल अमृत योजनेंतर्गत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थायी समितीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या योजनेंतर्गत पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागांत वृक्ष लागवड करण्यासह नागरिकांना वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इतर योजनांप्रमाणे ही योजनाही केवळ कागदावर राहू नये, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचे कंत्राट ज्या संस्थेला वा एजन्सीला दिले जाणार आहे. त्याची योग्यता व पूर्वानुभव याचाही प्राधान्याने विचार केला जावा, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.गत काही महिन्यांत जालना पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेला आहे. याचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही, याचीही तपासणी उच्चपदस्थ अधिका-यांकडून केली जाणार आहे.
जालना शहर होणार हिरवेगार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:24 AM