लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत १६ कोटी रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पालिकेने प्रारंभी शहरातील कचरा उचलण्यासाठी नवीन ३२ घंटागाड्यांची खरेदी केली आहे. या प्रत्येक गाडीवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. शहरातील विविध भागात सकाळी ५ वाजेपासूनच या गुड मॉर्निंग पथकाचे कचरा संकलन करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.जालना शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. जालना तालुक्यातील सामनगाव येथे उभारण्यात येत असलेल्या घनकचरा प्रकल्पाचे जुन्या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून, आता दोन कोटी रूपयांच्या नवीन प्रक्रिया करणाऱ्या मशिनरींची खरेदी करण्यात येणार आहे. या संदर्भातील ठराव नुकताच सर्व साधारण सभेत मंजूर केला आहे.३२ घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध वॉर्डात या गाड्या सकाळी पाच वाजेपासून फिरून कच-याचे संकलन करत आहेत. त्यामुळे शहरातील जागोजागी दिसणारा कचरा आता दूर होणार असून, नागरिकांनी या गाड्यांमध्येच कचरा टाकवा, असे आवाहन करण्यात आले. त्यातच शहरात पालिकेकडून जवळपास पाच हजार नवीन पथदिवे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, वीजबिलाचे दहा लाख रूपये पालिकेने वीज वितरण कंपनीकडे भरले आहेत.त्यामुळे गेल्या काही वर्षापासून बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू होऊन शहर उजळले आहे. दरम्यान, पैठण ते जालना ही जलवाहिनी काही शेतक-यांनी व्हॉल्व फोडून त्यातून पाणी चोरीचे प्रकार होत आहेत. हे रोखण्यासाठी जवळपास दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती संगीता गोरंट्याल यांनी दिली आहे.घंटागाड्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी आॅडिओ क्लिप तयार करण्यात आली असून, स्वच्छतेसह लसीकरण, कर भरणा, पाणी बचतीचे महत्व या आॅडिओ क्लिपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या घंटागाड्यांमध्ये सुनो भैय्या, सुनो भाभी, कचरा गाडी में डालो जी ही आॅडिओ क्लिप लावली आहे.
३२ घंटागाड्यांच्या माध्यमातून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:41 AM