- दीपक ढोलेजालना : शहरात उभा असलेल्या दुचाकीचा लॉक मास्टर कीने उघडायचे. ग्रामीण भागातील नागरिकांना अपघातातील गाडीचे पार्ट असल्याचे सांगून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली आहे. संतोष भास्कर जाधव व संतोष राजू पिंपळे (दोघे, रा. पळसखेडा पिंपळे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर औरंगाबाद, जालना, बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
संतोष जाधव हा पळसखेडा पिंपळे येथील रहिवासी आहे. तो सध्या नूतन वसाहत परिसरात राहतो. त्याच्यावर भोकरदन व कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपासून गुन्हेगारीकडे वळला आहे. त्याने साथीदारांसह जवळपास २०० ते २५० दुचाकी चोरून त्यांच्या पार्टची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून २९ दुचाकी जप्त केल्या होत्या. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
जालना जिल्ह्यात त्याच्यावर जवळपास २५ गुन्हे दाखल आहेत. तो शहरातील विविध भागांत उभ्या असलेल्या दुचाकीचे लॉक मास्टर कीने उघडायचा. त्यानंतर ती दुचाकी घेऊन पळसखेडा पिंपळे येथील त्याचा साथीदार संतोष पिंपळे याच्याकडे द्यायचा. तो दुचाकीचे पार्ट करून इंजिन काढायचा. तसेच सदरील दुचाकी ही फायनान्स कंपनीने ओढून आणलेली असून, ती तुम्हाला कमी किमतीत देतो, असे सांगून तिची विक्री करायचा. तर काही गाड्यांचे पार्ट व इंजिन काढून हे पार्ट अपघातातील दुचाकी असून, तुम्हाला कमी किमतीत देतो, असे सांगून विकायचा. पोलीस अनेक दिवसांपासून दोघांच्याही मागावर होते. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. दुर्गेश राजपुत, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ यांनी केली आहे.
तीन जिल्ह्यांत धुमाकूळजालना, औरंगाबाद, बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून चार दुचाकी व १ इंजीनसह १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सराईत दुचाकी चोरटा संतोष जाधव हा जालना शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून नूतन वसाहत येथील उड्डाणपुलाजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सदरील दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही गुन्हेगारांची माहिती काढली. या माहितीवरून सदरील आरोपीस जेरबंद केले आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.- सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक, एलसीबी