लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे तलाठी सय्यद खालेद यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात अनेक जमिनी प्रकरणांमध्ये त्यांनी महसूल तसेच राजकीय पुढाऱ्यांकडून कशी आर्थिक मागणी केली जाते याची वक्तव्य केले. हे प्रकरण गंभीर असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सय्यद यांना तातडीने निलंबित केले आहे.जमिनीचे बेकायदा व्यवहार, लाच रक्कम जमा करण्याच्या चर्चेच्या जवळपास चार ते पाच आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यासंदर्भात तलाठी सय्यद यांनी कार्यालयातून १६ जीबीचा पेनड्राईव्ह चोरीस गेल्याची तक्रार यापूर्वीच दाखल केली होती. ही चोरी जियाउ्द्दीन कमरोद्दीन कादरी यांनी केल्याचे तक्रारीत नमूद होते. यापूर्वीही कादरी यानी तलाठी खालेद यांच्या विरूध्द सर्वे क्रमांक ४८९/२ मधील क्षेत्रफळ दुरूस्तीच्या कामासाठी ६ लाख ८० हजार रूपये लाच मागितल्याविरूध्द उपोषणही केले होते. यापूर्वी तलाठी सय्यद यांना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. नंतर पुन्हा वादग्रस्त असतानाही त्यांना जालन्यासारख्या महत्त्वाच्या सज्जावर नेमणूक दिल्याने देखील मोठी चर्चा झाली होती. एकूणच सय्यद यांच्या आॅडिओ क्लिपमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, पैशांची होणारी मागणी, वाळू तस्करी, नेत्यांचे नातेवाईक तसेच पोलीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, महसूलमधील अधिका-यांकडून होणारी आर्थिक देवाण-घेवाण याबद्दल उहापोह आहे.
तलाठ्याला वादग्रस्त संभाषण ‘क्लिप’ भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:26 AM