लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आम्ही परंपरेचे राजे परंतू आपण तर विद्येचे राजे आहात, असे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला होता. बाबासाहेबांना शिक्षणासाठी सर्वप्रथम शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड होते. जाती आता आल्या परंतु मराठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जवळचा संंबंध होता. आता परिवर्तनाचं युग आल्याने जातीच्या पलिकडे जाऊन पाहण्याचा आपला दृष्टीकोन झाला पाहिजे, त्यामुळे जयंती साजरी करताना जरुर नाचा परंतु अगोदर बाबासाहेब वाचा, असे प्रतिपादन धनंजय पाटील यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते देशातील सद्यकालीन परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर पाचवे गुंफताना पाटील बोलत होते. यावेळी विचारपीठावर चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. बी. एम. साळवे, संजय खोतकर, सिमोन सुतार, सुनील साळवे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.देशातील विद्यमान स्थितीवर भाष्य करताना त्यांनी अनेक पैलू उलगडून दाखविताना बहुजन आणि विशेषत: मराठा समाजावर आपल्या व्याख्यानातून प्रखर विचार मांडले. ते म्हणाले की, मराठा समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाहक नको त्या गोष्टी पेरल्या जातात. मात्र, मराठ्यांचा आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकरांचा खूपच जवळचा संबंध होता. अशी किती तरी नावे घेता येतील की त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सर्वात आधी मराठा समाजाने हात पुढे केले होते. जय भवानी जय शिवाजी हा नारा आजचा नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा नारा आहे. म्हणजेच बाबासाहेब आणि मराठा समाज वेगळे नव्हतेच. इतिहास याचा साक्षीदार आहे.सर्वात प्रथम बाबासाहेबांना भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञान कुणी सांगितलं? तर ते मराठ्यांनी सांगितलं, हेही लक्षात घ्या, असे सांगून ते म्हणाले की, आजच्या युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला नाचण्याऐवजी त्यांना वाचले पाहिजे. ती खरी काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही-आम्ही भक्त झालो म्हणूनच बाबासाहेबांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. एकूणच समाजामध्ये द्वेष भावना पसरविण्याचे काम त्या काळात मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.
जाती आता आल्या, पण बाबासाहेब आणि मराठ्यांचा जवळचा संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:39 AM