लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. याचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयावरही झाला असून, जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल पाच उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ऐन दुष्काळात रोजगार हमी योजना विभागासाठी तब्बल सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी मिळत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे.लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या तसेच अन्य कारणांवरून उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांची औरंगाबाद येथे तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी हे देखील औरंगाबाद येथे गेले आहेत. तर भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कटके यांचीही बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची गंगाखेडला बदली झाली आहे.सध्या अपर जिल्हाधिका-यांचा पदभार हा जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्याकडू आहे. तर निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अन्य पदे रिक्त असल्याने महसूलच्या एकूणच कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बदली होऊ गेलेल्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती होताना काही कालावधी जाणार असल्याचे सांगण्यात आले. महसूल प्रमाणेच पोलिसांच्याही बदल्या झाल्या असून, तहसीलदारांच्या बदल्या झाल्याने तालुका पातळीवरही कामकाज ढेपाळले आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांविना जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:00 AM