जालना : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी वाटूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेट देत शेतपिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पारंपरिक पिकाबरोबरच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, तालुका कृषी अधिकारी एस. एन. गाडे, मंडळ कृषी अधिकारी घुगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सर्वप्रथम वाटूर येथील प्रसाद हजारे यांच्या शेतातील सोयाबीन जोडओळ पीक प्रात्यक्षिकास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत प्रियंका रामेश्वर शिनगारे (रा. कवठा) यांच्या रोपवाटिकेस भेट दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकरी गौतम कोले यांच्या शेतीमधील नवीन विहिरीच्या कामांची पाहणी केली.