यंदा चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती नव्हत्या. परंतु काही गणेश मंडळांची प्रभावळ ही पाच ते सात फूट उंच असल्याचे दिसून आले. मोती तलाव परिसरात पालिकेकडून यंदा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोती तलावाजवळून जाणारा जालना ते औरंगाबाद हा वळण रस्ता एकेरी वाहतुकीसाठीच खुला होता. त्यातही गणेश मंडळांनी आणलेल्या मूर्ती या पालिकेचे कर्मचारी घेऊन नंतर ते तलावात विसर्जन करत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना यंदा तलावात जाऊन स्वत: मूर्तीचे विसर्जन करता येत नव्हते. काही मंडळांनी छोट्या रिक्षांमधून मिरवणुका काढून विसर्जन केले. यावेळी सामाजिक संस्थांनी गणपतीच्या निर्माल्याचे संकलनही केले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडले.
रात्री दहा वाजता संपले विसर्जन
नेहमी जालन्यात गणेश विसर्जन हे दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू असते. परंतु यंदा रात्री दहा ते साडे दहानंतर बोटावर मोजता येतील एवढेच गणेश मंडळांनी मूर्ती आणल्या होत्या. सरासरी दहा वाजेपर्यंत यंदा गणेश विसर्जन संपल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला.