भोकरदन : तालुक्यातील केदारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या फत्तेपूर येथील उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फत्तेपूर उपकेंद्राअंतर्गत मासनपूर, जोमाळा, फत्तेपूर या गावांतील सर्व ग्रामस्थांना कोविड लसीकरण सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी २०२ जणांनी लस घेतली. गावातील जास्तीतजास्त लोकांचे कोविड लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. लटपटे यांनी सांगितले. या केंद्राचे उद्घाटन सरपंच सुलोचना बरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपसरपंच भास्कर वनारसे, विठ्ठल बरडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुधीर लटपटे, ग्रामसेवक नाना गावंडे, पर्यवेक्षक एस.एम. वाघ, डॉ. प्राजक्ता भिसडे, एस.जी. डवरे, ए.आर. काळे, ऐ.जी. कादरी, रमेश बरडे, अंकुश बरडे, रतन बरडे आदींची उपस्थिती होती.
४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये एका दिवसात २०२ लोकांचे लसीकरण करण्यात आले असून, उपकेद्राअंतर्गत गावातील पात्र लाभार्थ्यांनी जास्तीतजास्त कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन फत्तेपूरचे सरपंच सुलोचना बरडे यांनी केले आहे.