लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थिती अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी स्थायी समितीच्या सभेत घेतला. परंतु, सदस्यांसह सभापतींनी सभेला दांडी मारल्याने गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे ही सभा फक्त चहा पाण्यापुरतीच ठरली. यावेळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे विरोधक अध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळाले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी दुपारी दोन वाजता स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.दोन वाजेपर्यंत पदाधिकारी न आल्याने सभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, तेवढ्यातच दोन सदस्य आल्याने सभा सुरू करण्यात आली. यावेळी अध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला.सध्या तीव्र पाणीटंचाई भासत असून, अनेक ग्रामपंचायती टँकरची मागणी करीत आहेत. परंतु, जालना बीडीओंनी टंचाई आराखड्यात १११ टँकर मजूर असूनही, त्यांनी फ्कत ११ गावांमध्ये २७ टँकर सुरु केले आहे. याबाबत अध्यक्षांनी जालना बीडीओंना चांगलेच धारेवर धरले.दरम्यान, त्यानंतरही सदस्य व सभापती न आल्याने सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे विरोधक सदस्य शालीकराम म्हस्के व अवधूत खडके यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बाजूला बसून अनौपचारिक चर्चा करत टंचाईचा आढावा घेतला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, मुख्य लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, समाज कल्याण सभापती दत्ता बनसोडे, सदस्य जयमंगल जाधव, शालीकराम म्हस्के, अवधूत खडके यांची उपस्थिती होती. तर चार सभापती आणि सहा सदस्य गैरहजर होते.
पाणीटंचाईचा आढावा घेऊन बैठकीची औपचारिकता पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:05 AM