लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर कामांपैकी आतापर्यंत एक हजार तीन कामे पूर्ण झाली असून, कृषी विभागाने सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली असून, गाव आराखड्यानुसार दोन हजार ५४६ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषी, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, जलसंपदा या विभागांतर्गत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आतापर्यंत नाला खोलीकरण-रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, सलग समतल चर, बांध-बंदिस्ती, तलावांमधील गाळ काढणे, जलपूर्णभरण आदी दोन हजार ५४२ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे.पैकी दोन हजार १९९ कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, ही कामे सुरू आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यात सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत. तर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा या विभागांनी आतापर्यंत एकही मंजूर काम पूर्ण केलेले नाही.वनविभाग, सामाजिक वनीकरण व पंचायत समिती कार्यालयाने आतापर्यंत अनुक्रमे केवळ १६, ११ व १३ कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाची बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. जूनअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिली.
‘जलयुक्त’ची एक हजार कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:40 AM