लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे जिल्ह्यातील प्रत्येक बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पीककर्जाच्या दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात यावी. उद्दिष्ट पूर्ण न करणा-या तसेच पीककर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई करणा-या बँकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.परतूर येथील तहसील कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा त्यांनी घेतला. त्याप्रसंगी उपस्थित अधिका-यांनीा मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, ब्रिजेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, सध्या शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. या काळात शेतक-यांना बियाणे, खते आदी खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. जिल्ह्यातील सर्व बँकांना पीककर्जाच्या वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. ३० जूनपर्यंत८० टक्के तर १५ जुलैपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानासुद्धा कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले.पीकविमा, जलयुक्त शिवार, बोंडअळीची नुकसान भरपाई इ. चाही सविस्तर आढावा येथे घेण्यात आला. एकूणच आजच्या बैठकीत पालकमंत्री लोणीकरांनी अत्यंत बारकाईने विचारपूस करून आकडेनिहाय माहिती देण्याचे सांगितले. पीककर्ज मेळव्यांचाही यावेळी तपशील जाणून घेण्यात आला. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील यंत्रणासंनी आळस झटकून कामाला लागण्याचे निर्देश यावेळी दिले.एकूणच या बैठकीनंतर कामांना गती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:18 AM