लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : येथे चारा छावणी सुरू झाल्यामुळे परिसरातील पशुपालकांची चिंता मिटली असून दिवसेंदिवस या छावणीत जनावरांची संख्या वाढत चालली असल्याचे छावणी चालक ज्ञानेश्वर पुंगळे यांनी सांगीतले.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाच्या दाहकतेने सामान्यासह शेतकरीवर्ग हवालदिल झालेला आहे. त्यातच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, मजुरांना रोजगार इ. समस्यांनी नागरिक हैराण आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चारा समस्येने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे होऊन बसले होते. तसेच चा-याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना पशंूचे संगोपन करणे अवघड होऊन बसले होते. पशुपालकांनी नाइलाजाने जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरूवात केली होती. मात्र रविवार पासून येथे चारा छावणी सुरू झाल्याने पशुपालकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या चारा छावणीत जनावरांना मुरघास, ऊस, ढेप, शाळूचा चारा, कुट्टी इ.खाद्य दिले जात आहे. तसेच पाण्याची सोय होत असल्याने शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पंचक्रोशीतील पन्नास खेड्यांतून राजूरला एकमेव चारा छावणी असल्याने शेतक-यांना नाइलाजाने जनावरे येथे आणावी लागत आहेत. सध्या शासनाकडे अनेक गावांतून चारा छावणीचे प्रस्ताव दाखल आहेत. परंतु, प्रशासनाकडे मंजुरी अभावी धूळ खात पडून आहे.तसेच शेतक-यांच्या सोयीसाठी चांधई ठोंबरी, बाणेगाव, लोणगाव परिसरात चारा छावणीला मंजुरी देऊन पशुपालक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
राजुरातील चारा छावणीने पशुपालकांची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:36 AM