जालना : कोणीही यावे व टपली मारून जावे, अशी गत व्यापारी वर्गाची झालेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
मागील चार वर्षांपासून वस्तू व सेवा कर, नोटबंदी, राजकारण्यांचा बंद, ऑनलाइन मार्केटिंगचे छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झालेले अतिक्रमण, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन या सर्व समस्यांमुळे देशातील सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहे. या सर्व विषयावर मार्ग काढण्यासाठी व सरकारने व्यापाऱ्यांना या सर्व समस्येतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्याबरोबर जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या चर्चासत्रात ललित गांधी म्हणाले की, व्यापारी वर्ग हा नेहमीच सोशिक राहिला असून अन्याय निमूटपणे सहन करत आलेला आहे. जोपर्यंत सरकार व्यापार वृद्धीसाठी लागणारे कायदे सुटसुटीत करत नाही तोपर्यंत व्यापार-उद्योग वाढीस पोषक वातावरण तयार होणार नाही असेही ते म्हणाले.
ललित गांधी यांच्या या राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. गांधी यांच्या या दौऱ्याच्या आधारे तयार केलेला अहवाल राष्ट्रीय शिखर संस्थेबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांना सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी यांनी केले. सूत्रसंचालन महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांनी तर बंकटलाल खंडेलवाल यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सुनील रायठठ्ठा, संजय दाड, राजेश राऊत, अर्जुन गेही, इदरचंद तवरावाला, विजय राठी, सुभाष देविदान, विजय बगडिया, राजेश कामड, दिलीप शहा, विनोद कुमावत, विजयचंद सुराणा, नागेश बेनीवाल, महेश भक्कड, मनीषा तवरावाला, प्रमोद गंडाळ, संजय रुईखेडकर, कांतीलाल राठी, दत्तप्रसाद लड्डा, योगेश ठक्कर, प्रमेन्द्र अग्रवाल,विजय दाड, विष्णू चेचाणी, अनिल पंच, राम भंडारी, दिनेश शाह, रवी पटेल, सुशील बेगानी, राजकुमार रुणवाल, महेश दुसाने, गिरधारी लधानी, गोवर्धन करवा, अजय देसरडा, अभय कुलकर्णी, अविनाश भोसले, संजय गणात्रा, वीरेंद्र रुणवाल, दर्शन जैन, नटवर मर्दा, ईश्वर बिल्होरे इत्यादींची उपस्थिती होती.
--------
सरकारने कुठलेही पॅकेज दिले नसल्याची खंत
जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी व कार्यकारी सचिव शाम लोया यांनी वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यापासून आतापर्यंत ९५० वेळा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाचे जे नुकसान झाले त्याबद्दल सरकारने कुठलाही मोठे पॅकेज व्यापाऱ्यांना दिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.