घनसावंगी : घनसावंगी येथे बुधवारी मनमानी पद्धतीने लसीकरण करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. शिवाय, आरोग्य कर्मचाऱ्याने लसीचा साठा परत नेल्याने गोंधळात भर पडली.
नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. येथे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. लसीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. या केंद्रावर सुरुवातीला २० जणांचे लसीकरण अगदी सुरळीत झाले. त्यानंतर मागच्या दाराने आलेल्यांचे, अनुक्रम न ठेवता मनमानी पद्धतीने तर काही जणांचे ऑफलाइन पद्धतीने लसीकरण करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. लसीचा साठा ९० इतका असताना शंभरावर टोकन वाटप झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले. उडालेल्या गोंधळामुळे आरोग्य कर्मचाऱ्याने उर्वरित लस ताब्यात घेऊन आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासह केंद्रावरून काढता पाय घेतला. त्यातच दुसरीकडे लस नेऊन लसीकरण झाल्याची चर्चा सुरू झाली. केंद्रावर लस नसल्यामुळे उपस्थित लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी नगरपंचायतीमध्ये गोंधळ घातला.