लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी झालेली मागील बैठक गोंधळामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुन्हा विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या सुरूवातीपासूनच भाजप व महाविकास आघाडीच्या सदस्यांनी वाटाघाटीवरून गोंधळ केला. परंतु, नंतर हातमिळवणी करून बिनविरोध निवडणूक पार पडली.या सभेला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सर्व विभागांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, वित्त व लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती.सभेला राष्ट्रगीताने सुरूवात झाली. मागील सभा गोंधळामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार सभेच्या सुरूवातीलाच सदस्यांनी गोंधळ घातला. सदस्य शालिकराम म्हस्के म्हणाले, मागील दोन्हीही सभेत इतिवृत्ताला मान्यता दिली. तरीही या सभेत इतिवृत्ताला मान्यता कशी देता येईल ? असा प्रश्न उपस्थित केला. या मुद्यावरून सभेत भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला.मागील सभेची सदस्यांना नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. ज्या सदस्यांना अर्ज भरायचे होते. त्या सदस्यांना नोटीस न मिळाल्याने अर्ज भरता आले नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. यावरून सभेत मोठा गोंधळ उडाला. या गोंधळातच माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची विनंती अध्यक्षांना केली. त्यानंतर शालिकराम म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेतला.जिल्हा परिषदेत मर्जी प्रमाणे कामे सुरू असून, जिल्हा परिषदेत हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही निवडणूक प्रक्रिया होऊ देणार नसल्याचे भाजपचे सदस्य म्हणाले.भाजपच्या सदस्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात केंद्रे म्हणाले, आज निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईलच. तुम्ही माजी तक्रार विभागीय आयुक्तांकडे करू शकतात.यावरूनच भाजपचे सदस्य आक्रमक झाले. एक अधिकारी असे कसे बोलू शकतो. केंद्रे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. गोंधळानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्र यांनी माफी मागितली. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली. भाजप व महाविकासआघाडीच्या सदस्यांमध्ये वाटाघाटीवरून अर्धातास चर्चा झाली. त्यानंतर सर्व समित्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.जि.प.ची सभा : अन् सीईओ संतापल्याअंगणवाडी बांधकामाच्या प्रशासकीय मान्ययता देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी राजकीय हित संबंध जोपासले असल्याचा आरोप सदस्य शालिकराम म्हस्के यांनी केला. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना राग अनावर झाला. त्या म्हणाल्या, तुम्हाला माझी तक्रार करायची असेल तर करा मी कुठल्या प्रकारचे हितसंबंध जोपासले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वित्त अधिकारी चव्हाण यांनी सभागृहाल सविस्तर माहिती दिली.यांची झाली बिनविरोध निवडजलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी अनिरुध्द खोतकर, समाजकल्याण समिती अनिरुध्द खोतकर, दत्ता बनसोडे, वित्त समिती वैशाली गावंडे, विमल गोरे, बांधकाम समिती जिजाबाई कळंबे, रघुनाथ तौर, सतिश टोपे, आरोग्य समिती भागवत रक्ताटे, पशुसंवर्धन समिती शिला शिंदे, विमल पाखरे, बापूराव खटके, कृषि समितीच्या सदस्यपदी विमल पाखरे यांची बिनविरोध निवड झाली.यांनी घेतले अर्ज मागेचर्चेनंतर जलव्यवस्थापन समितीच्या एका जागेसाठी आलेल्या चार अर्जांपैकी गंगासागर पिंगळे, सतिश टोपे, शालिकराम म्हस्के यांनी अर्ज मागे घेतले. समाजकल्याण समितीच्या दोन जागेसाठी आलेल्या तीन अर्जांपैकी गंगासागर पिंगळे यांनी अर्ज मागे घेतला. बांधकाम समितीच्या ३ जागांसाठी आलेल्या पाच अर्जांपैकी अनिरुध्द खोतकर, शैलाबाई पालकर यांनी अर्ज मागे घेतले. महिला व बालकल्याण समितीच्या एक जागेसाठी जिजाबाई कळंबे यांचा अर्ज आला होता. परंतु, त्यांनीही अर्ज मागे घेतला.
वाटाघाटीवरून गोंधळ...अन हातमिळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:15 AM