जालना : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायकल रॅली काढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
गेल्या दीड वर्षापासून देशातील जनता कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. अनेकांचे रोजगार गेले असून, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहरातील हुतात्मा जनार्धनमामा यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली महावीर चौक, सुभाष चौक, मुथा बिल्डिंग, लोखंडी पूल, मस्तगडमार्गे गांधी चमन येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, प्रभाकर पवार, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, त्रिंबक पाबळे, विठ्ठलसिंग राजपूत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, शेख शमशू, सय्यद निजाम आदींची उपस्थिती होती.