जालन्यात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 08:54 PM2020-01-14T20:54:54+5:302020-01-14T20:55:52+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
जालना : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. पुस्तक प्रकाशित करणारे भाजपचे नेते जयभगवान गोयल यांना तात्काळ अटक करावी, यासह इतर मागण्याही करण्यात आल्या आहेत.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. भाजप नेत्याने प्रकाशित केलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. हा प्रकार शिवप्रेमी जनतेचा, भारतवर्षाचा घोर अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकाचे लेखक, प्रकाश, मुद्रक आणि ज्याठिकाणी हा प्रकाशन सोहळा करण्यात आला त्या सर्व संबंधितांविरूध्द जनतेच्या भावना दुखववल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, जयभगवान गोयल याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, दिनकर घेवंदे, राम सावंत, शेख शमशोद्दीन, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुश राऊत, किशन जेठे, सुषमा पायगव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तनपुरे, मंगल खांडेभराड, धर्मा खिल्लारे, राधेशाम जैस्वाल, नगरसेवक जगदीश भरतीया, संजय शेजूळ, दत्ता शिंदे, कृष्णा पडोळ, ज्ञानेश्वर कदम, सोपान तिरूखे, अंजेभाऊ चव्हाण, समाधान शेजूळ, वैभव उगले, विनोद यादव, फकीरा वाघ, राहुल आदींची उपस्थिती होती.