मराठा समाजाची दिशाभूल करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कैवारी असल्याचे दाखवले : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:34 PM2019-01-28T13:34:20+5:302019-01-28T13:35:30+5:30
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मुद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पध्दतीने हातळला.
जालना : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मुद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या पध्दतीने हातळला. केवळ दिशाभूल करुन आम्हीच समाजाचे कैवारी असल्याचे दाखवले, अशी जोरदार टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज केली.ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलत होते.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आघाडी सरकारने नारायण राणे समितीची स्थापना केली होती. परंतु ते आरक्षण टिकले नाही कारण मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिकदृष्टया मागासलेला आहे, याचा अहवाल दिला नव्हता. परंतु आमच्या सरकारने या आयोगाचा अहवाल घेवून विधीमंडळात या आरक्षणाचा ठराव मंजूर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुल्य प्रवर्गातील आर्थिक-दुर्बल घटकानाही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधकांच्या एकत्र येण्याची भीती नाही
एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहे, असे सांगून त्याची भिती बाळगण्याचे कारण नाही. केंद्र आणि राज्य सरकारने बहुतांश कल्याणकारी योजना राबविली आहे. त्यामुळे त्या योजना लोकांपर्यत पोहोचून निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.