बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:44 AM2019-11-08T00:44:37+5:302019-11-08T00:45:02+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर शेतकऱ्यांनी औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीयकृत बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य, शिक्षणातील प्रश्न यासह इतर विविध विषयावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाने तातडीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, पंजाब अँड महाराष्ट्र बँक अडचणीत आल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई द्यावी, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवहारांमुळे ही मंदीची लाट आली असून, २०१०-११ मध्ये १०.८ असलेला जीडीपी २०१९ मध्ये ५ टक्क्यांवर आला आहे.
अनेक कंपन्या बंद पडल्याने दोन लाख कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा आली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. शासनाने शेतकरी, गरीब, मागास, अल्पसंख्याकांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यांसोबत आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहूल देशमुख व पदाधिका-यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जालना- औरंगाबाद महामार्गावरील खड्डे बुजवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, संजय पाटील, माजी आ. धोंडीराम राठोड, कल्याण दळे, आर. आर. खडके, विजय जºहाड, नबाब डांगे, महेमूद शेख, एकबाल कुरेशी, भीमराव डोंगरे, फकिरा वाघ, विमल पाटील, प्रमिला सूर्यवंशी, शहाजहाँ शेख, प्रा. रंगनाथ खेडेकर यांच्यासह शहरासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतक-यांना तातडीने मदत द्या : अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा
वडीगोद्री / जामखेड : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल तातडीने शेतक-यांना मदत द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी बीड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मागण्यांचे निवेदन पोउपनि हनुमंत वारे यांना देण्यात आले.
यावेळी पांडुरंग गटकळ, मुजीब पटेल, बबन मंडलिक, राजू जायभाये, मदन जायभाये, प्रभाकर पाटोळे, अर्जुन जायभाये, छगन हाजारजे, भानुदास सिरसाठ, नवनाथ जायभाये, विष्णू भिंगारे, रुस्तुम पठाण, इम्रान पठाण, रामेश्वर मैंद, गजानन जायभाय, मकसूद पठाण, मुबारक पठाण, भगवान वैद्य, रमेश मंडलिक, गफूर पठाण, विकास भिंगारे, हरिभाऊ खंडागळे, विकास भिंगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.