जाफराबाद (जि. जालना ) : खडी क्रशरची तक्रार का केली म्हणून भाजप कार्यकर्ते सागर संतोष लोखंडे, चेतन संतोष लोखंडे, दत्ता प्रल्हाद लोखंडे व इतर ८० ते ९० जणांनी मिळून युवक काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद भास्कर फदाट (वय ३३, रा. बोरगाव फदाट) यांना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रमोद फदाट यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे महाविकास आघाडी व भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला असल्याचे दिसून येत आहे. फदाट यांनी मागील आठवड्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या खडी क्रशरसंदर्भात जाफराबाद तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. तालुक्यातील एसआरएल या खडी क्रशर मालकाने अवैधरीत्या जाफराबाद तालुक्यातील माहोरा, देऊळगाव उगले, गोपी आदी गावांत विनापरवाना दगड उत्खनन केले असल्याने संबंधित मालक व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी प्रमोद फदाट यांनी उपोषण केले होते. हे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते.
मंगळवारी फदाट हे जाफराबाद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्या दालनात चर्चा करत असताना भाजपचे कार्यकर्ते सागर लोखंडे, चेतन लोखंडे व दत्ता लोखंडे हे दालनात आले. यावेळी ८० ते ९० जणांसह बेदम मारहाण केली असल्याचा आरोप प्रमाेद फदाट यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये केला आहे. तसेच चेतन लोखंडे यांनी पाठीला बंदुकीसारखे हत्यार लावून तहसील कार्यालय ते जाफराबाद शहराच्या मुख्य चौकापर्यंत मारहाण करून तक्रार मागे घे, अन्यथा तुला संपून टाकू अशी धमकी देऊन बेदम मारहाण केल्याची तक्रार फदाट यांनी दाखल केली आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार, जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सखाहरी तायडे करीत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात येऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कुंडलिक मुट्ठे, सुरेश गवळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.