लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशातून गरिबी हटावाचा नारा हा काँग्रेसची नौटंकी असून, पंडित नेहरूंपासून ते राहुल गांधी पर्यंत पाच पिढ्या झाल्या आहेत, परंतु देशातील गरिबी हटली नाही. आम्ही पाच वर्षात जो काही विकास केला त्यातून देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. याही वेळेस जनतेने पंतप्रधान मोदींनाच दुसऱ्यांदा संधी देण्याचा मनात निश्चय केला आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांनी टीका केली. ते जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ गुरूवारी जालन्यात आले होते.येथील आझाद मैदानावर त्यांची सभा झाली. पुढे शहा म्हणाले की, शरद पवार आम्हाला हिशोब मागत आहेत, परंतु त्यांच्या काळात सिंचनावर७२ हजारकोटी रूपये खर्च झाला, त्यातून किती सिंचन झाले हे जनतेनेच सांगावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. हे सर्व पैसे कोणी हडप केले हे नव्याने सांगण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. १३ व्या वित्त आयोगातूनही तत्कालीन केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानेच पुसल्याचे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या काळात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाल्याचे शहा म्हणाले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख कोटीची परकीय गुंतवणूक आणल्याचा दावा शहा यांनी केला.पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला हा मोदी सरकारने १२ व्या दिवशीच घेल्याचे सांगून, काँग्रेस सरकारच्या काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचे ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानला र्इंट का जबाब पत्थरसे देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करून बालाकोट येथील एअरस्ट्राईकचा मुद्दा उपस्थित केला. ज्यावेळी ही कारवाई झाली, त्यावेळी पाकिस्तान आणि राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीत मातम पसरल्याचे सांगून, हिंदस्थापासून काश्मीर आम्ही कदापी तोडू देणार नसल्याचा उल्लेख ही शहा यांनी केला. तसेच फारूक अब्दुलांचे पुत्र उमर अब्दुला हे काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा अशी भूमिका घेत आहेत, त्याबद्दलची भूमिका राहुल गांधी आणि शरद पवार यांनी स्पष्ट करावी असे आवाहन केले. देशातील घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी आम्ही एनआरसी लागू करणार असल्याचे ते म्हणाले. भाजच्या संकल्पनामा या जाहीर नाम्यातील मुद्यांचा उहापोह शहा यांनी केला. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून देशातील २३ लाख रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ.संदीपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचालन भास्कर दानवे यांनी केले.दानवे माझे ‘प्रेम’ - अर्जुन खोतकरप्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आम्ही दानवेंना महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी करू असे आश्वासन देत, खोतकरांनी दानवे आणि आमचे संबंध ३० वर्षापासून आहेत. त्यामुळे ते माझी मेहबूबा तर मी त्यांचे प्रेम असल्याचे सांगून हशा पिकविला.
गरिबी हटाव ही काँग्रेसची नौटंकी- अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 1:03 AM