जालना : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी नऊ हजारांची लाच स्वीकारणा-या आष्टी (ता.परतूर) येथील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. विश्वनाथ कोंडिबा ठाकरे ( रा.बोरगाव, ता.जालना, ह.मु. जायकवाडी कॅम्प आष्टी), असे लाच स्वीकारणा-या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या आईवर पत्नीच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पो.कॉ. विश्वनाथ ठाकरे याच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच जामीन मिळेल, अशी कागदपत्रे तयार करण्यासाठी ठाकरे याने तक्रारदारास वीस हजारांची लाच मागितली. लाच दिली नाही तर अटक करून जेलमध्ये पाठवीन, असे सांगितले. तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेच्या मागणीची पडताळणी करून एसीबीने आष्टी पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी दुपारनंतर सापळा लावून ठाकरे यास पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीजवळ नऊ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, रमेश चव्हाण, खंदारे यांनी ही कारवाई केली.
लाच घेताना कॉन्स्टेबल चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:11 PM