कोरोनामुळे बँक आणि ग्राहक दोघेही अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध बँका आणि पतसंस्थांकडून कर्ज काढून कोरोना काळात लहान-मोठे व्यवसाय तसेच घरबांधणी करण्यात आली; परंतु घेतलेले कर्ज फेडताना कोरोनामुळे अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाने थैमान घातले होते. याचा परिणाम एकूणच आर्थिक घडी विस्कटण्यावर झाला आहे. यातून सावरताना वेगवेगळे प्रयत्न करूनही पूर्वीएवढे उत्पन्न आणि नोकरीतून मिळणारे वेतन अपुरे पडत आहे. यामुळे घेतलेल्या कर्जावर व्याज आकारले जात असल्याने सिबिल स्कोअर दिवसेंदिवस खालावत चालला आहे.
मध्यंतरी वेगवेगळ्या बँकांनी विविध योजनांद्वारे गृहकर्जासह अन्य छोटे - मोठे व्यवसाय उभारणीसाठी कमी व्याजदरात कर्ज देऊ केले होते; परंतु आता हे कर्ज फेडताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्ज थकीत आहे.
- सारंग लंके
शासनाच्या सर्वांना घर देण्याच्या योजनेनुसार अडीच लाख रुपयांची सबसिडी ही घर नावावर नसणाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आपणही त्यातून गृहकर्ज घेतले; परंतु आता नोकरी, व्यवसाय अडचणीत आल्याने ते फेडताना ओढाताण होत आहे. - दिलीप नळणीकर
कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतर छोटे किराणा दुकान कर्ज काढून सुरू केले होते; परंतु प्रत्येकजण कुठला न कुठला व्यवसाय करत असल्याने दुकानामध्ये पूर्वीसारखी ग्राहकी नाही. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे.
- प्रकाश ठाकूर
कोरोनाकाळामध्ये बँकांनी वेळेवर कर्ज दिल्याने मोठा दिलासा मिळाला होता; परंतु त्याचे व्याजदर आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न यात विसंगती होत गेली. यामुळे बँकांचे हप्ते फेडण्यास अडचण आली आहे.
- उद्धव वैद्य
थकीत कर्ज वसूल करताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत; परंतु आम्ही केवळ कर्जदाराला या काळामध्ये विनंती करून शक्य तेवढे जास्तीत जास्त कर्ज फेडावे, अशी सूचना देत आहोत. त्यामुळे सक्तीची वसुली बंद आहे.
- शिरीष देवळे, व्यवस्थापक
कोरोनामुळे गावगाडा अडचणीत सापडल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना अडचणी येत आहेत. हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत येत असली तरी कर्ज भरण्यासाठी पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही.
- नीलेश आडेप, व्यवस्थापक
१६६७ जणांना नोटीस
जिल्ह्यात विविध बँकांकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीचा तगादा केला जात नाही; परंतु नोटीस देऊन संबंधित कर्जदाराला व्याजवाढीसंदर्भात सतर्क केले जाते.
नोटीस आल्यानंतर अनेकजण थोडीबहुत रक्कम भरत असल्याचे दिसून आले.
सारीच कर्जे थकली; गृहकर्जाचे प्रमाण जास्त
n लहान-मोठा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या बँकांमधून व्यावसायिकांनी कर्ज घेतले आहे.
n असे असतानाच सर्वात जास्त कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण हे गृहकर्ज या प्रकारात मोडत आहे.
n गृहकर्ज देताना बँकांना तारण ठेवण्यासंदर्भात शंका नसल्याने, हे कर्ज तातडीने देण्यात येते.