जालना : तीन वकिलांनी सुपारी दिल्यानंतर, जागेवर कब्जा करण्यासाठी आलेल्या १५ ते २० जणांनी एका बांधकाम व्यावसायिकाला काठीने मारहाण करत चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूचे कामगार बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीला धावल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील डीमार्टच्या बाजूला गट क्रमांक ५५४ मध्ये शुक्रवारी घडली.
या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बांधकाम व्यावसायिक अंकित अभयकुमार आबड (३२ रा.नळगल्ली काद्राबाद) यांनी फिर्याद दिली आहे. डीमार्टच्या बाजूला गट क्रमांक ५५४ मध्ये आपल्या मालकीची जागा असून, डीमार्टच्या मागील बाजूस बांधकाम व्यवसायाशी निगडित कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जण या जागेवर काहीतरी करत आहेत, असे भाऊ अनुपकुमार आबड याने अंकित आबाड यांना फोनवर सांगितले. त्यामुळे ते दोन कामगारांना सोबत घेऊन तेथे गेले.
त्या ठिकाणी असलेल्या संशयितांपैकी एक जणाने त्यांना काठीने पायावर मारहाण केली. नंतर तिथे असलेला संशयित घनश्याम खाकिवाले हा चाकू घेऊन मारण्यासाठी धावून आला. तेव्हा संशयित संतोष सलामपुरे हा तिथे होता. अंकित आबड हे तेथून पळत असताना, बांधकामावर काम करत असलेले २५ ते ३० कामगार त्यांच्या मदतीला धावले. भाऊ अनुम आबडही तिथे आला. तुम्ही आमच्या जागेवर का आला, असे विचारले असता, तीन वकिलांनी आम्हाला या जागेवर कब्जा करण्याची सुपारी दिल्याचे संतोष सलामपुरे व घनश्याम खाकिवाले यांनी सांगितले. नंतर संशयित वकिलांची भेट घालून दिली.
तेव्हा वकिलांनी यांच्याशी काय बोलता, यांना तर मारायचे आहे, असे सांगितले. आमच्यासोबत कामगार असल्यामुळे यातील संशयित वकील दीपक माधवराव काकडे (रा.औरंगाबाद), बाबासाहेब गोविंदसिंग बायस (रा.आशीर्वादनगर) व अन्य एक यांनी ही जागा आम्ही तुमची आत्या संध्या राजेंद्र डागा, चंदन गोटवानी, विजयसिंग चौधरी यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. मात्र, कागदपत्रांबाबत विचारले असता, त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्रे नव्हती. या प्रकरणी संतोष सलामपुरे, घनश्याम खाकिवाले, तीन वकिलांसह अन्य १५ ते २० जणांविरुद्ध तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर अधिक तपास करत आहेत.