जालना: रस्त्यावर काट्या टाकल्याच्या कारणावरून एका युवकाचा खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारात बुधवारी रात्री मध्यरात्री घडली. योगेश भुजंगराव सुळसुळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी २ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश सुळसुळे याने लालवाडी शिवारातील गट नंबर ९९ मध्ये शेतातील रस्त्यावर काट्या टाकल्या होत्या. रस्त्यावर काट्या का टाकल्या यावरून ज्ञानेश्वर किसन शिंदे, रामप्रसाद ज्ञानेश्वर शिंदे, शिवप्रताप ज्ञानेश्वर शिंदे (सर्व रा. लालवाडी, अंबड) यांचा योगेश सोबत वाद झाला. यातून तिघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून योगेशचा खून केला. पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने धनगर पिंप्री, हस्तपोखरी शिवारातील तलावात योगेशचा मृतदेह फेकून दिला.
दरम्यान, याप्रकरणी योगेशच्या भावाच्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.